चिपळुणातील आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी शक्तिप्रदर्शन करून जनआक्रोश मोर्चा काढला.
परभणी येथे संविधान प्रतिकृतीची झालेली विटंबना, संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या, लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेले वक्तव्य अशा पार्श्वभूमीवर चिपळुणातील आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी शक्तिप्रदर्शन करून जनआक्रोश मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी मोर्चाच्या माध्यमातून प्रांत कार्यालयावर धडकले. यामध्ये वृद्धांसह महिला, युवक-युवतींचा लक्षणीय सहभाग होता.
राज्यातील परभणी येथे काही दिवसांपूर्वी संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली तर बीड येथे संविधान रक्षक सरपंच सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली. त्याचप्रमाणे गृहमंत्री शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेले वक्तव्य या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी जन आक्रोश मोर्चा काढला. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हजारोंच्या संख्येने अनुयायी जमा झाले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत अनुयायांनी आंबेडकर चौकापासून प्रांत कार्यालयार्पंत मोर्चा नेला.