गोव्यात दर आठवड्याला होताहेत 5 अपघाती मृत्यू; बळींची संख्या पोहोचली पावणेतीनशेवर.
वर्ष २०२४ संपायला फक्त एक दिवस बाकी असताना गोवा राज्यातील रस्त्यांवरील बळींच्या संख्येने पावणे तीनशेचा आकडा पार केला आहे. यंदा २९ डिसेंबरपर्यंत रस्तेअपघातांत २७६ जणांचा मृत्यू झाला आहे.तरीही गतसालच्या तुलनेत ही संख्या बरीच कमी आहे. मागच्या वर्षी (२०२३) ३१ डिसेंबरपर्यंत २९१ जणांना अपघातांत प्राण गमवावे लागले होते.यंदाच्या वर्षाचा शेवटचा दिवस कसा जाईल याबद्दल काहीसे चिंतेचे वातावरण आहेच. या दिवशी अपघात नियंत्रणात रहावेत यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे.
रात्रीच्या वेळी दारू पिऊन वाहने चालवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. यंदा १ जानेवारी ते २९ डिसेंबर या काळाचा आढावा घेतल्यास राज्यात दरदिवशी सात ते आठ अपघात व दर आठवड्याला पाच ते सहा बळी गेले आहेत.हे मृत्यूंचे प्रमाण ३१व्या तासाला एक असल्याचे दिसून आले आहे. यंदा १ जानेवारी ते २९ डिसेंबर या कालावधीत गोव्यात २६५२ अपघातांची नोंद झाली. त्यातील २६२ अपघात गंभीर होते. त्यात २७६ जणांचा बळी गेला आहे. असे असले तरी मागच्या वर्षाच्या तुलनेत अपघातांचे प्रमाण ५.५४ टक्क्यांनी तर मृत्यूंचे प्रमाण १ टक्क्याने कमी झाले आहे.