
पोलिस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत दोन संशयितांनी केली वृध्दाची तब्बल 61 लाख रुपयाची फसवणूक
पोलिस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत दोन संशयितांनी वृध्दाची तब्बल 61 लाख 19 हजार 80 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. फसवणूकीची ही घटना शनिवार 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते शुक्रवार 27 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वा. कालावधीत नाचणे परिसरात घडली आहे.साई प्रसाद पुरुषोत्तम गावडे (65, रा.साई छाया सदन औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नाचणे,रत्नागिरी) यांनी शनिवार 28 डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, संशयितांपैकी एकाने फिर्यादी यांना फोन करुन मी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी करत फिर्यादींना तुमचे सिमकार्ड बंद होणार असल्याची भिती घातली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रारीकरता कॉल फॉरवर्ड करत असल्याचा बहाणा करत दुसर्या संशयिताने फिर्यादीशी 21 डिसेंबर ते 27 डिसेंबरच्या कालावधीत व्हॉटसअॅपवरुन हेमराज कोळी नावाचा पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करत संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही संशयितांनी संगनमताने फिर्यादीला तुमकच्या बँक खात्यातून 2 कोटी रुपयांचा मनी लॉड्रिंगचा व्यवहार झाला असल्याची भिती घालून त्यांच्या बँक खात्यातून 61 लाख 19 हजार 80 रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली.