
जिल्हास्तरीय मिनी सरस व विक्री प्रदर्शन दोन दिवसात 25 लाख 61 हजार रुपयांची विक्री
रत्नागिरी, दि. 30 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस व विक्री प्रदर्शनामध्ये अवघ्या दोन दिवसात 25 लाख 61 हजार रुपयांची विक्री झाली आहे.
हे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन हे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील स्वरोजगारींनी, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते. यामध्ये बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तु (बुरुड काम, गोधडी, लोकरीच्या विणकाम केलेल्या वस्तु, क्रेयॉनच्या वस्तु, इमिटेशन ज्वेलरी इत्यादी) विविध प्रकारचे घरगुती मसाले (मच्छी मसाले, मटण मसाले) पिठे, पापड (नाचणी, उडीद, लसुण, सोयाबीन, पालक, बीट, टोमॅटो, पोहयाचे, ओव्याचे इत्यादी) लोणची (आंबा, लिंबू, मिरची, आवळा, करवंद इत्यादी) कोकम, आगळ इत्यादी., कोकणी मेवा (काजूगर, काजू मोदक, आंबावडी, आमरस, आंबापोळी आवळा मावा, फणसपोळी, करवंद चडी, तळलेले गरे इत्यादी) विविध फळांची सरबते (जांभूळ सिरप, आंबा सिरप, काजू सिरप, आवळा सिरप इत्यादी) रस, कोकणी खादयपदार्थ (मोदक, आंबोळी, थालीपीठ, पुरणपोळी, घावणे, नारळवडी, जेवण, नर्सरी (आंबा कलमे, काजू कलमे, नारळ कलमे, चिकू कलमे, कोकम कलमे, विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे. बोन्साय इत्यादी) मध माफक दरात ग्राहकांना उपलब्ध आहेत.
28 डिसेंबर रोजी सुरु झालेल्या प्रदर्शनास पर्यटकांनी तसेच ग्राहकांनी मोठ्या संख्येने भेट दिली आहे. दोन दिवसातच 25 लाख 61 हजार रुपयांची विक्री झाली आहे.प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, तालुका विस्तार अधिकारी गोपाळ चौधरी, जिल्हा अभियान व्यवस्थापक अय्याज पिरजादे, जिल्हा विपनण व्यवस्थापक अमोल काटकर, जिल्हा व्यवस्थापक माहिती संकलन नयना बोरकर आदींनी आज भेट देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा सांगता समारंभ 1 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. 000