राज्य सरकार बदलले; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या
रत्नागिरी : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर शासकीय बदल्यांना ब्रेक लागला आहे. बदल्यांची जुनी यादी रद्द होणार असून त्याला आता दिवाळीनंतर मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलीसाठी कुंपणावर असलेला अधिकारी वर्ग धास्तावला आहे. राज्यात नवीन सरकारने पदभार स्वीकारला असला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे. विस्तार झाल्यानंतर नव्या मंत्र्यांचा खातेवाटप आणि विभाग समजून घेण्यात आणखी काही कालावधी जाणार आहे. राज्यात सत्तापालट झाल्याने या बदल्या पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. बदल्यांच्या विषयाला सध्या नवीन मंत्री लगेचच हात घालतील, अशी शक्यता कमी आहे. तसेच जुन्या सरकारमधील बदल्यांची यादी रद्द होऊन तिचे नूतनीकरण करणे, या सर्व प्रक्रियेत आणखीन दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून बदल्यांसाठी प्रयत्नशील असलेल्या अधिकार्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.