प्रकल्पस्थळी वायू प्रदूषण नियंत्रण नियमाचे उल्लंघन केल्यास २० लाखांपर्यंतचा दंड, एमएमआरडीएचा निर्णय, कठोर कारवाई होणार!

मुंबई – मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत असून हवेचा दर्जा खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. वायू प्रदुषणाला पायाभूत सुविधा विकास प्रकल्प आणि बांधकाम प्रकल्प कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता अखेर पायाभूत सुविधा विकास प्रकल्पस्थळावरील वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुढाकार घेतला आहे. त्यानुसार एमएमआरडीएकडून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे.

एमएमआरडीएच्या प्रकल्पस्थळी या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात आता कठोर कारवाई केली जाणार आहे. नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदाराला ५ लाखांपासून २० लाखांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे.वायू प्रदूषणाची गंभीर समस्या लक्षात घेता एमएमआरडीएने बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नियमावली आणि मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. त्यानुसार आता एमएमआरडीएच्या प्रत्येक प्रकल्पस्थळावर आणि तेथील कामांवर नजर ठेवली जाणार आहे.

प्रकल्पस्थळावरील राडारोड्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जात आहे का, प्रकल्पस्थळावरील वाहनांची वाहतूक नियमांनुसार केली जात आहे का, साफसफाई ठेवली जात आहे का अशा अनेक बाबींची तपासणी नियमितपणे केली जाणार आहे. एमएमआरडीएच्या नियमावलीचे उल्लंघन करत वायू प्रदुषण करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी दंडात्मक कारवाईचा पर्याय एमएमआरडीएने निवडला आहे. त्यानुसार एमएमआरडीएच्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदाराला ५ लाखांपासून ते २० लाखांपर्यंतचा दंड आकारला जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.एमएमआरचा विकास करताना पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास होणार नाही याकडे लक्ष देण्यात येणार आहे.

पुढच्या पिढीसाठी आरोग्यदायी वातावरण देण्यास आमचे सरकार वचनबद्ध असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारणे हा आपणा सर्वांचा प्राधान्यक्रम आहे. बांधकामामुळे होणारे वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी एमएमआरडीएने हाती घेतलेल्या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

हवेची गुणवत्ता सुधारणे आणि ती अबाधित ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आमच्या प्रकल्पातील सर्व कंत्राटदारांनीही आता आपली जबाबदारी ओळखत स्वच्छ आणि प्रदुषणविरहीत मुंबईसाठी योगदान द्यावे, असे आवाहन महानगर आयुक्त डाॅ संजय मुखर्जी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button