नववर्ष स्वागतापूर्वी पोलीस यंत्रणा सतर्क; रेव्ह पार्ट्यांवरही पोलिसांचे लक्ष!

ठाणे : नववर्ष स्वागताला अवघे चार दिवस शिल्लक असतानाच, सर्वत्र पार्ट्या आणि नववर्ष स्वागत कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. असे असले तरी काही पार्ट्यांमध्ये अमली पदार्थ तस्करांचाही सुळसुळाट असतो. त्यामुळे या पार्ट्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. ठाणे पोलीस दलाकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गस्ती घातली जाणार आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून खबऱ्यांच्या माध्यमातून अमली पदार्थ्यांच्या तस्करांची माहिती घेतली जात आहे. रेल्वे पोलीस देखील स्थानक परिसरात बंदोबस्त वाढविणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर भागासह विविध ठिकाणी ढाबे, हाॅटेल, रिसाॅर्ट आणि शेतघरांमध्ये ३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या दिवशी मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जात असते. या पार्ट्यांसाठी मुंबई, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातून तरुण-तरुणी येत असतात. पार्ट्यांमध्ये अनेकदा अमली पदार्थ तस्करी करणारे प्रवेश करतात. मागील वर्षी घोडबंदर भागातील जंगलामध्ये अशाचप्रकारे रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या रेव्ह पार्टीमध्ये मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुण सहभागी झाले होते. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईमध्ये ९० हून अधिक जणांना ताब्यात घेतले होते. यातील अनेकांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळले होते. तसेच कारवाईत अमली पदार्थांचा साठाही पोलिसांनी जप्त केला होता.

यावर्षी देखील पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या रात्री आणि नववर्षाच्या मध्यरात्री पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. रात्रीच्या वेळेत मद्यपी वाहन चालकांकडून वाहने चालविली जातात. त्यामुळे रात्री मद्यपी वाहन चालकांची तपासणी वाहतुक पोलिसांनी सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालाकांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून रात्रीच्या वेळेत गस्ती घातली जाणार आहे. रेव्ह पार्ट्यांच्या आयोजनाबाबत समाजमाध्यमांद्वारे निमंत्रण मिळत असते. त्यामुळे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून समाजमाध्यमांवर लक्ष आहे.नववर्ष स्वागता निमित्ताने रात्रीच्या वेळेत अनेकजण फिरण्यासाठी मुंबईमध्ये जात असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेत घरी परतणाऱ्या महिलांसाठी स्थानक परिसर आणि महिलांच्या डब्यामध्ये लोहमार्ग पोलीस कर्मचारी असणार आहे. तसेच महाराष्ट्र सुरक्षा दल आणि गृहरक्षक दलाचे कर्मचारीही मदतीला असतील, अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठाणे आयुक्तालय क्षेत्रात पोलिसांची नाकाबंदी असेल. रेव्ह पार्ट्यांवर पोलिसांचे लक्ष आहे. वाहतुक पोलिसांकडून मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जात आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून नववर्ष उत्साहात साजरा करावा. *– ज्ञानेश्वर चव्हाण, सह आयुक्त, ठाणे पोलीस.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button