
गणपतीपुळेत मिनी सरस प्रदर्शन.
रत्नागिरी जिल्ह्याचे मिनी सरस व प्रदर्शन २०२४ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने २८ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीमध्ये श्री क्षेत्र गणपतीपुळे संस्थान परिसरात आयोजित करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिला बचत गटांच्या उत्पादीत मालाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी दरवर्षी जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये सरस व प्रदर्शन जिल्ह्यातील मिळून एकूण ७५ बचत गट सहभागी होणार आहेत. जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन हे ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या विविध उत्पादीत मालांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते. सदर विक्री व प्रदर्शनामध्ये बचत गटांनी उत्पादीत विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू (बुरूड काम, गोधडी, लोकरीच्या विणकाम केलेल्या वस्तू, क्रेयॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी इत्यादी) विविध प्रकारचे घरगुती मसाले (मच्छी मसाले, मटण मसाले), पिठे, पापड (नाचणी, उडीद, लसूण, सोयाबीन, पालक, बीट, टोमॅटो, पोहा, ओवा इत्यादीचे) लोणची (आंबा, लिंबू, मिरची, आवळा, करवंद इत्यादी) कोकम, आगळ, कोकणी मेवा (काजूगर काजू मोदक, आंबावडी, आमरस, आंबापोळी, आवळा मावा, फणसपोळी, करवंद वडी, तळलेले गरे इत्यादी) विविध फळांची सरबते (जांभूळ सिरप, आंबा सिरप, काजू सिरप, आवळा सिरप इत्यादी), रस, कोकणी खाद्यपदार्थ (मोदक, आंबोळी, थालीपीठ, पुरणपोळी, घावणे, नारळवडी) जेवण, नर्सरी (आंबा कलमे, काजू कलमे, नारळ कलमे, चिकू कलमे, कोकम कलमे, विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे, बोन्साय इत्यादी) मध माफक दरात ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
प्रदर्शनाचा कालावधी हा नाताळसुट्टीचा असल्याने पर्यटक व शाळांच्या सहली मोठ्या प्रमाणात थेट देत असतात. त्याचा फायदा उत्पादीत मालाची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्यास होईल, असा विश्वास पुजार यांनी व्यक्त केला आहे.www.konkantoday.com