
माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन,देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. वृद्धापकाळाने त्यांची दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्राणज्योत मालवली.त्यांच्या जाण्याने अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे (२७ डिसेंबर) आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.मनमोहन सिंग यांना काल रात्री ८ वाजता आपत्कालीन परिस्थिती दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री ९.५१ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझे आदर्श हरपल्याची भावना राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, २७ डिसेंबर रोजी आयोजित केलेली सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येणार आहे. आज ११ वाजता यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.