
प्रति पालकमंत्र्यांनी सभा व्हर्च्युअल घ्याव्यात- बाळ माने
रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रति ‘पालकमंत्र्यांनी’ शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी विविध खात्यांच्या आढावा बैठकांचे आयोजन केले आहे. मात्र एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना आणि सुट्टीच्या दिवशी अशा बैठका लावल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. खरे तर या सभा ‘व्हर्च्युअल’ असाव्यात. कारण ते ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यात त्यांना ‘तंत्रज्ञान’ आहे. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी हे सारे सुरू आहे. त्याऐवजी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी पुरेसे लक्ष द्यावे, असा टोला भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी लगावला आहे. सुटीच्या दिवशी बैठका आयोजित केल्याने शासकीय कर्मचारी वर्गसुद्धा नाराजी व्यक्त करत आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर चालू असताना अशा सभा व्हर्च्युअल आयोजित कराव्यात अशी मागणी होत आहे. प्रति पालकमंत्री हे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री असल्यामुळे त्यांना ‘तंत्रज्ञान’ चांगलेच अवगत आहे. त्यामुळे त्यांनी याच सभा व्हर्च्युअल घ्याव्यात. तसेच अलीकडे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अन्य सरकारी कार्यालयांमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले आहेत. सभांना हेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतात. अशावेळी थेट सभांचे आयोजन केल्यास सोशल डिस्टंसिंग तसेच नियमांचे पालन योग्य रीतीने केले जात नाही. त्यामुळे अशा सभा या गुगल मीट किंवा झूम ॲप किंवा अन्य शासनमान्य ॲप द्वारे घेण्यात याव्यात, अशी स्पष्ट सूचना माजी आमदार बाळ माने यांनी केली. सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. दररोज १५० ते २०० या दरम्यान रुग्ण सापडत असल्याने सर्व लोक भयग्रस्त आहेत. जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक खुर्चीचा प्रश्न सोडवून आणि आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याऐवजी नुसत्या सभा घेण्यापेक्षा कृती करा, सभा व्हर्च्युअल घ्या, असा टोलाही माने यांनी हाणला
www.konkantoday.com