
टीम इंडियाचा ट्रॉफी घेण्यास नकार, पण BCCI ने केलं मालामाल
भारतीय संघाने रविवारी (२८ सप्टेंबर) आशिया कप २०२५ स्पर्धा अंतिम सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवून जिंकली. दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत केले आणि नवव्यांदा आशिया कपवर नाव कोरले. त्यामुळे बीसीसीआयने भारतीय संघासाठी कोट्यवधींच्या बक्षीसाची घोषणा केली आहे.
भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. दरम्यान, हा विजय भारतासाठी आणखी खास ठरला आहे. भारताने या स्पर्धेत तीनवेळा पाकिस्तानला पराभूत केले. साखळी फेरी, सुपर फोर आणि अंतिम सामना असे तीन वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये भारतीय संघ पाकिस्तानवर वरचढ ठरला. तसेच आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला होता.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आशिया कपमध्ये हे दोन संघ आमने-सामने आल्याने या स्पर्धेतील दोन्ही संघांच्या सामन्यांना भावनिक किनारही होती. अशात आता भारतीय संघाने तीन वेळा पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धा जिंकल्याने भारतभरात आनंद साजरा होत आहे.
तथापि, आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष पाकिस्तानचे मोहसिन नाकवी असल्याने भारतीय संघाने त्यांच्या हातून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे प्रेझेंटेशनमध्ये केवळ सामनावीर, मालिकावीर पुरस्कार देऊन कार्यक्रम संपवावा लागला.
आता बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी तब्बल २१ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. याबाबत पोस्ट करताना बीसीसीआयने लिहिले की ‘३ धक्के. ० प्रतिसाद. आशिया कप चॅम्पियन्स. मेसेज पोहोचलाय. भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफसाठी २१ कोटी रुपयांचे बक्षीस.’




