
कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रातील साग चोरीप्रकरणी ७ जण ताब्यात

लांजा : तालुक्यातील कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रामध्ये ३० ऑगस्ट रोजी जंगल फिरती करत असताना लांजाचे वनपाल यांना ७ सागाची तोडलेली निदर्शनास आली. यातील अर्धे सागाचे लाकूड फरार केले असून, काही माल जागेवरच असल्याचे दिसून आले. याप्रकरणी लांजा वनरक्षक यांच्याकडे प्रथम गुन्हा नोंदवण्यात आला होता. या तपासात कुंभवडे येथील सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून अंदाजे ३ लाख १४ हजारांचे ७९० सागाचे लाकूड, तसेच या गुन्ह्यात वापरण्यात आलेली क्रेन जप्त करण्यात आली आहे.

याबाबत वन विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कुर्णे येथील जंगल सर्व्हे नं.१९१/१ या राखीव वनक्षेत्रामध्ये ३० ऑगस्ट २०२५ रोजी जंगल फिरती करताना वनपाल लांजा व वनरक्षक लांजा यांना सागाची ७ झाडे अवैद्य चोरतूट झाल्याचे निदर्शनास आले. त्यातील काही चोरतूट माल हा जागेवर असून, काही माल फरार केला असल्याचे दिसून आले. त्यानुसार वनरक्षक लांजा यांच्याकडे प्रथम गुन्हा (क्र. C०३/२०२५) दि. ३० ऑगस्ट रोजी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१)फ प्रमाणे नोंदविला असून, या गुन्ह्याच्या तपासामध्ये २४ सप्टेंबर रोजी या वन गुन्ह्यामधील संशयित आरोपी मनोज संजय पाटणकर, मंदार संजय पाटणकर, अजय नागूप्रसाद निषाद, शत्रूघ्न दत्ताराम गोठणकर, विजयकुमार रामशंकर निषाद, मंदार मनमोहन बारस्कर आणि शुभम रवींद्र गुरव (सर्व रा. कुंभवडे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या गुन्ह्यामधील मुद्देमाल हा रातोरात क्रेनच्या साह्याने ट्रकमध्ये भरून तो कुर्णे ते कुंभवडे येथे आणून उतरवला. हा मुद्देमाल परत क्रेनच्या साह्याने दुसऱ्या ट्रकमध्ये भरून तो माडबन (ता. राजापूर) येथील माडबनकडे जाणाऱ्या कसबा मिठगवाणे पिकपशेडपासून साधारणपणे ४०० मी. अंतरावर स्थानिक नाव पठार येथे लपवून ठेवल्याची माहिती संशयित आरोपी मनोज संजय पाटणकर यांनी दिली.
त्यानुसार जागेवर जाऊन या गुन्ह्यामधील मुद्देमाल एकूण साग नग ३१/७.४९५ घमी. इतका असून, त्याची बाजार भावाने अंदाजे किंमत ३ लाख १४ हजार ७९० इतकी असून हा माल राजापूरचे वनाधिकारी यांनी ताब्यात घेतला आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा साग माल वनरक्षक लांजा यांच्याकडे ताबा पावतीने ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान, लांजा येथे क्रेन (क्र. MH09GM0452) जप्त केली असून याप्रकरणी पुढील तपास चालू आहे. तसेच या वन गुन्ह्यामध्ये समाविष्ट असणारी वाहने व इतर साधन सामग्री आदी बाबींचा तपास चालू आहे.
या गुन्ह्याचा तपास मुख्य वनसंरक्षक (कोल्हापूर) श्री. गुरुप्रसाद, रत्नागिरी चिपळूणच्या विभागीय वनअधिकारी श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या गुन्हाच्या कारवाईसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, वनपरिक्षेत्र वनअधिकारी (फिरते पथक, रत्नागिरी) जितेंद्र गुजले, वनपाल (राजापूर) जयराम बावदाणे, वनपाल (लांजा) सारीक फकीर, वनपाल (पाली) न्हानू गावडे, वनपाल (देवरुख) सागर गोसावी, वनपाल श्री. जी. एम. पाटील, वनरक्षक (राजापूर) विक्रम कुंभार, वनरक्षक (लांजा) श्रीमती नमिता कांबळे, वनरक्षक (कोर्ले) श्रीमती श्रावणी पवार, वनरक्षक विशाल पाटील, वनरक्षक सूरज तेली, वनरक्षक आकाश कुडकर, वनरक्षक श्री. जालने मेजर, वनरक्षक श्री. साबणे, वनरक्षक श्रीमती सुप्रिया काळे आदी उपस्थित होते.
पुढील तपास चालू आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने विभागीय वनअधिकारी रत्नागिरी श्रीमती गिरीजा देसाई यांनी केली आहे.




