मुख्यमंत्र्यांचा बनावट व्हिडिओ; १२ सोशल अकाऊंटवर गुन्हा दाखल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बनावट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या १२ विविध सोशल मीडियावरील खातेधारकांविरुद्ध मंगळवारी महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा नोंदवला आहे. फडणवीस यांच्या भाषणातील नेमके संवाद बाजूला काढून त्याआधारे हा खोटा व्हिडिओ तयार करण्यात आला असल्याचे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट व्हिडिओमुळे फडणीस यांच्याबद्दल समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतो, समाजातील एका गटाच्या भावना दुखावू शकतात आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा आशयाची तक्रार भाजपने सायबर सेलकडे केली.
त्या आधारे गुन्हा नोंदवत, व्हिडिओ तयार करणारी व्यक्ती आणि तो पसरवणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच द्विटर, इन्स्टाग्राम, यू ट्यूब, फेसबुक या समाजमाध्यमांना नोटीस बजावत, खातेधारकांची माहिती मागविण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा नोंदवत तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने अधिक तपास सुरू आहे.