नवजात शिशू रुग्णवाहिका, कर्करोग निदान उपकरणे, परिचारिका प्रशिक्षण वाहनाचे लोकार्पण. सुविधांचा कमीत कमी वापर व्हावा सर्वांना निरोगी आयुष्य मिळावे -उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि.25 :- 15 कोटी रुपये खर्चून जिल्हा सामान्य रुग्णालय अद्यावत होत आहे. कोकणातील पहिली नवजात शिशू रुग्णवाहिका त्याचबरोबर कर्करोग निदान उपकरणे यांचे लोकार्पण आज झाले असले तरी, या सुविधांचा कमीत कमी वापर व्हावा. सर्वांना निरोगी चांगले आयुष्य मिळावे, असे मार्गदर्शन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत नवजात शिशू रुग्णवाहिका, कर्करोग निदान उपकरणे, 5 रुग्णवाहिका, परिचारिका प्रशिक्षण वाहन यांचा लोकार्पण सोहळा जिल्हा सामान्य रुग्णालयात उद्योगमंत्री श्री सामंत यांच्या हस्ते आज झाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, तहसिलदार राजाराम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी उपस्थित होते.
उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स आता सेवा देणार आहेत. प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणे ही आरोग्य सेवेतील महत्वाची बाब आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डाॕक्टर्स ती बजावत अहेत. खासगी डॉक्टरांचेही कौतुक करायला हवे. अनेकांना मोफत उपचार करतात. शुल्क कमी करतात. रुग्णांची काळजी बहिणीप्रमाणे घेता यावी म्हणूनच सिस्टर्स हे नाव देण्यात आले आहे. या क्षेत्रात 4 लाख रोजगार देण्याचा करार जर्मनीने भारताशी केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्सनी आरोग्य यंत्रणेला दिशा देण्याचे काम केलेले आहे. त्यांचा आदर्श घेवून सध्याच्या डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी कामकाज करावे. ठरविले असते तर, माझी वैयक्तिक अनेक महाविद्यालये आणता आली असती. परंतु, मी ते केले नाही. गोरगरिबांच्या भल्यासाठी, सर्वसामान्यांच्या मुलांसाठी जिल्ह्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा आणली आहे. शासकीय केंद्रीय शाळा तीन मंजूर झाल्या आहेत.
त्यासाठी 200 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना केंद्रीय शाळांमध्ये शिकता येणार आहे. रत्नागिरीला मला एज्युकेशन हब करायचे आहे. ते ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे इथे रोजगार निर्माण झाला आहे. येत्या काळातही आरोग्य यंत्रणा सेवा देण्याबरोबरच रोजगार निर्मिती करेल. यापध्दतीने सक्षम करावयाचे आहे, असेही उद्योगमंत्री म्हणाले.
*आणखी पाच प्रि कॅन्सर डिटेक्शन युनिटसाठी 1 कोटी* उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, महिला स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात अशा महिलांसाठी प्रि कॅन्सर डिटेक्शन 1 युनिट आज आले आहे. 5 युनिट येणार आहेत. अजून 5 युनिटची आवश्यकता असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून 1 कोटी द्यावेत त्यावर जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी उद्याच दिले जातील असे सांगितले. उदय सामंत प्रतिष्ठानच्यावतीने लवकर बऱ्या न होणाऱ्या जखमांचे ड्रेसिंग उपकरण यावेळी देण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले, जिल्ह्यातील 24 आरोग्य केंद्रांना कायाकल्प पारितोषिक मिळाले आहे. 50 टक्के ग्रामपंचायती टीबी मुक्त झाल्या असून, उर्वरित ग्रामपंचायातींनाही करण्याची कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्रांचे नुतनीकरण आणि अद्यावतीकरण होत आहे. प्रास्ताविकेत डॉ. जगताप यांनी सविस्तर माहिती दिली. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला धन्वंतरीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. पूर्वा पेठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. आठल्ये यांनी सर्वांचे आभार मानले.