
दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी वर्ग केल्याने लांजा बौद्धवाडीतील ग्रामस्थ आक्रमक.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत लांजा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ साठी आरक्षित केलेला विकास निधी लांजा नगरपंचायतीने अन्य प्रभागात वळवल्याने प्रभाग ४ मधील लांजा बौद्धवाडीचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
दरम्यान या प्रकरणी जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त यांच्याकडे न्याय मागण्यात आला असून वेळ पडल्यास मुंबई हायकोर्टात या विरोधात दाद मागणार असल्याचे प्रभाग क्र. ४ चे नगरसेवक लहू कांबळे यांनी सांगितले.
आपल्या प्रभागाचा, हक्काचा निधी अन्य प्रभागामध्ये वळविण्याचे कारण काय? असा संतप्त सवाल नगरसेवक लहू कांबळे, लांजा बौद्धवाडीच्या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. लांजा ग्रामस्थ बौद्धजन मंडळ ग्रामीण विभाग, महिला मंडळ बौद्धवाडी लांजा यांनी लांजा नगरपंचायतीला एक पत्र देत आपला संताप व्यक्त केला आहे.www.konkantoday.com