
खेडमध्ये गो-वंश हत्येचे रॅकेट उघड; तिघांना अटक.
खेड तालुक्यातील देवणे पूल परिसरातील नारिंगी नदीपात्रात रविवारी २२ रोजी गो-वंशाचे अवशेप आढळल्यानंतर हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. त्यातच सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास देवणे पूल येथील नदीपात्रात पुन्हा एकदा गो-वंशाचे अवशेष आढळून आले.चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी या प्रकरणातील तीन जणांना अटक करण्यात आल्याचे तसेच त्यांच्याकडून मांस व एक जिवंत बैल हस्तगत करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच नागरिकांनी पोलिसांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन श्री. राजमाने यांनी यावेळी केले.
खेडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गोवंश हत्या होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. रविवारी दुपारी खेड शहरानजीकच्या नारिंगी नदीवरील देवणे पुलाखाली गोवंशाची हत्या करून त्याचे अवशेष छिन्नविच्छिन्न अवस्थेत टाकलेले काही नागरिकांना दिसले. हा संतापजनक प्रकार कानोकानी पसरून घटनास्थळी गर्दी जमली होती.