खासदार नारायण राणे यांच्या हस्ते कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या पदकांचे अनावरण.
रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या पदकांचे अनावरण माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. राणे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी आंब्याच्या आकारातील या पदकांचे विशेष कौतुक करत अनावरण केले. ही स्पर्धा कोकणच्या पर्यटन वाढीसाठी खूपच फायदेशीर असून आयोजकांना लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाकरिता टीम कोकण कोस्टलचे सुहास ठाकूरदेसाई, कौस्तुभ सावंत, नंदकुमार चव्हाण, प्रसाद देवस्थळी, राकेश नलावडे आदी उपस्थित होते. अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने ही मॅरेथॉन होणार असून ७० हून अधिक शहरांमधून फिटनेसप्रेमी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पहिल्या पर्वाप्रमाणेच रत्नागिरी शहरातील जास्तीत जास्त हॉटेल फिटनेस टुरिस्टकडून बुक झाली आहेत. रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन या उपक्रमांचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत.
स्पर्धेतील विजेते आणि स्पर्धा वेळेत पूर्ण करणाऱ्यांना आंब्याच्या आकारातील हे पदक प्रदान करण्यात येणार आहे. थिबा पॅलेस रोड येथून सुरू होणारी २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन स्पर्धा नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, चिंचखरी, वेसुर्ले, कोळंबे, फणसोप, भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर पूर्ण होणार आहे. या मार्गावरील ग्रामपंचायती आणि ग्रामस्थ रुट सपोर्ट करणार आहेत. तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लब या स्पर्धेचे रूट पार्टनर आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाने या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले आहे.