काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीचा ‘चिल्लई कलान’ हंगाम सुरू; तापमानाने मोडला ५० वर्षांचा विक्रम!
काश्मीरमध्ये हिवाळ्यातील कडाक्याच्यासर्वात कडक्याच्या थंडीचा ४० दिवसांचा कालावधी म्हणजेच ‘चिल्लई कलान’ शनिवारपासून (२१ डिसेंबर) सुरू झाला आहे. या हंगामाची सुरूवात रक्त गोठवणाऱ्या थंडीने झाल्याचे पाहायला मिळाले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी श्रीनगर येथील नागरिकांनी गेल्या ५० वर्षांमधील सर्वात थंड डिसेंबर महिन्यातील रात्र अनुभवली, या रात्री तापमान उणे ८.५ सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते. तर रविवारी सकाळी श्रीनगरमध्ये उणे ३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थंडीच्या लाटेच्या तीव्रता इतकी जास्त होती की दल सरोवराच पृष्ठभाग देखील गोठल्याचेही दिसून आले.
श्रीनगर येथे डिसेंबर महिन्यातील रात्री नोंदवलेले उणे ८.५ अंश सेल्सिअस तापमान हे १९७४ पासूनचे सर्वात कमी तापमान आहे. तेव्हा शहरात १०.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात गेले होते. १८९१ नंतर ही तिसरी सर्वात थंड रात्र होती. तर १३ डिसेंबर १९३४ रोजी श्रीनगरमध्ये डिसेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमान उणे १२.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.’चिल्लई कलान’ हा कालावधी ३१ जानेवारी २०२५ रोजी संपेल मात्र त्यानंतर देखील कश्मीर खोऱ्यात थंडीची लाट सुरूच राहाणार आहे. या ४० दिवसांच्या कालावधीनंतर या भागात २० दिवसांची चिल्लाई खुर्द आणि १० दिवसांची चिल्लाई-बच्छा सुरू होईल.
या काळात देखील नागरिकांना थंडीचा सामना करावा लागेल.जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील कडाक्याच्या थंडीची दखल घेतली आहे. त्यांनी त्यांचे जम्मू मधील आगामी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. २६ डिसेंबर २०२४ पर्यंत येथीलतापमाना आणखी दोन ते तीन अंशांनी खाली घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
काश्मीरमधील वरच्या भागात मंगळवारी हिमवृष्टी झाल्याचे पाहायला मिळाले, यादरम्यान खोऱ्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमान अनेक अंशांनी गोठणबिंदूच्या खाली घसरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. काश्मीर खोऱ्यात पारा घसरल्याने अनेक जलसाठ्यांच्या पृष्ठभागावर बर्फाचा पातळ थर जमा झाल्याचे पाहायला मिळाले, याबरोबरच पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइन देखील गोठल्या आहेत.श्रीनगर येथे सोमवारी उणे ६.६ अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती. पहलगाम येथे तापमान उणे ७.८ अंश सेल्सियस पर्यंत खाली गेले होते. गुलमर्गमध्ये रात्रीचे तापमान उणे ७.४ अंश सेल्सिअस, काझीगुंडमध्ये उणे ६.२ अंशांवर पोहचले होते, तर पंपोर भागातील कोनिबल हे गाव खोऱ्यातील सर्वाधिक गारठलेले गाव ठरले येथे तापमान उणे ८ अंशांवर पोहचले.