
निवृत्त शिक्षिका सौ. तेजा मुळ्ये करताहेत कोविड रुग्णांचे समुपदेशन,काेविड रुग्णांशी संवादातून घालवत आहे भीती
गेले सहा महिने रत्नागिरी कोरोना महामारीशी लढा देत आहे. मनामध्ये प्रचंड अस्वस्थता, अनेक प्रश्न, घरच्यांची काळजी अशा मानसिकतेमध्ये समाज पुढे जात आहे. डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय या कोरोना योद्ध्यांसोबत कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधून त्यांना आत्मविश्वास देण्याचे काम निवृत्त शिक्षिका सौ. तेजा रविंद्र मुळ्ये करत आहेत. यासुद्धा एक कोरोना योद्धा ठरल्या आहेत
त्या काेविड रुग्णांशी संवादातून भीती घालवत आहेत
त्यांच्या या अनुभवाबद्दल त्या काय म्हणतात ते त्यांच्या शब्दातच पाहूया
अपेक्स कोव्हीड रुग्णालयात सेवेसाठी जायला लागून आज मला 13 दिवस झाले. मला माझा अनुभव तुम्हा सर्वांबरोबर शेअर करायचा आहे. डॉ. सुशील मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये यांनी नव्याने सुरू केलेले हे रुग्णालय रत्नागिरीच्या आयटीआयजवळ नाचणे येथे आहे. मी डॉ. सुशील मुळ्ये यांची काकू या नात्याने त्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आणि रुग्णांबरोबर संवाद करण्याची संधी मला मिळाली.
मी रोज 3 तास तेथे जाते. रोज पीपीई किट वापरते. पहिली सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे सुरुवातीपासूनच्या बातम्या पाहून मनात तयार झालेलं भयावह दृष्य सर्वांनी मनातून पुसून टाकावं अस मला सांगावंस वाटत. अजिबात कीव करावी, भीती वाटावी असे हे रुग्ण दिसत नाहीत. ‘भित्यापाठी ब्रम्हराक्षस’ या म्हणीचा वापर येथे करावासा वाटला तुम्ही घाबरलात, भीतीने समजूनच घेतलं नाही तर हा आजार तुम्हाला अशक्त बनवण्यापेक्षा ही भीती तुम्हाला कमजोर करते. तुम्ही नीट समजून घेतलं, आपल्यावर होणार्या उपचारांची गरज, आपण कसे रहावे, आहार काय ठेवावा, आपण किती उठून चालावे, कशी काळजी घ्यावी तर हा असाध्य आजार अजिबात नाही, जो पेशन्ट हे समजून घेतो तसे वागतो असा पेशन्ट सर्वसाधारणपणे 7 ते 8 दिवसात स्वतःच्या पायाने चालत आरामात घरी जातो. हे मी पाहिले. जास्त वयाचे रुग्ण देखील या आजाराला छान सामोरे जात आहेत, पूर्ण बरे होऊन घरी जात आहेत. त्यांच्याशी बोलताना आपण छान शांतपणे बोललो, घाबरत असणार्या रुग्णाला समजावून देऊन, त्याला हा स्वतःमधील आजार काढून टाकायला तयार केलं तर तो रुग्ण या आजारातून अलगद बाहेर पडताना 2, 3 दिवसात त्याच्यातला फरक पाहून मलाही समाधान मिळत.
मी रोज साधारण 60 ते 65 रुग्णांना भेटते, त्यांची चौकशी करते, त्यांच्या काही शंका असतील तर डॉक्टरांशी संवाद साधून त्या रुग्णाला समजावून देते, त्यांच्या बरोबर काम करणार्या कर्मचारी वर्गाला आवश्यक तर सूचना देते आणि त्यांनाही उत्साहित करते, कर्मचारी आणि रुग्ण यांचं छान नात तयार होण्यासाठी मार्गदर्शन करते त्यामुळे रुग्णाला ऐकटं वाटत नाही. माझेही कामाचे दिवस जसे वाढत आहेत तसे माझा तिथे काम करण्याचा उत्साह सर्व काळजी घेऊन वाढत आहे. रुग्ण माझ्या ठराविक वेळेला भेट होण्याची वाट पहाताना अनुभवास येत आहे. मला या कार्य समाधान मिळत आहे.
आपला जीव आपण मिळवणं आणि तो राखून ठेवणे म्हणजे काय हे हा आजार शिकवतो अस मला अनूभवास येत आहे. तुम्ही तुमच्या रुटीन मधून बाहेर येऊन सामोर जाण हे पहिलं काम रुग्णाने स्वतःवर करायची गरज आहे. याचा अर्थ तुमचा व्यवसाय, नोकरी, पेक्षा हे सर्व तुमच्या जगण्याचा अविभाज्य आणि तुम्हाला जगण्याचा अनिवार्य भाग असेल तरीही आता तुमचा जीव जगला तर हे सर्व त्यापुढे आवश्यक आहे. हे समजून घेतलं पाहिजे. त्यासर्व पोटार्थी कामांना बाजूला करून आपल्या जीवाची काळजी ओंजळीत घेण्याचा मनापासून जो ठरवतो आणि वागतो तो आपल्या जीवाचा दिवा आपल्याच ओंजळीने तेवत ठेवतो असा मी अनुभवांती निष्कर्ष काढला आहे.
लेखिका- सौ तेजा मुळ्ये
मोबाईल नंबर 86687 41082
www.konkantoday.com