वातावरणातील बदलामुळे समुद्रातील मासे गायब, मत्स्यप्रेमी चिंतेत.
सततच्या वातावरणातील बदलाचा परीणाम मासेमारीवरही होऊ लागला आहे. मागील दोन आठवडे बांगडा, म्हाकूळसारखी मासळीच हाती येत नसल्यामुळे मच्छीमारांना मोठा फटका बसलेला आहे. ट्रॉलिंगसह गिलनेटलाही मासे लागत नसल्याने अनेकांनी नौका उभ्या करून ठेवलेल्या आहेत. परप्रांतिय नौकांसह एलईडीद्वारे मासेमारी होत असल्यामुळे किनारी भागातील मासळी पकडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेल्या १६० किलोमिटर समुद्रकिनाऱ्यावर हजारो मच्छीमारी कुटूंबे आहेत. समुद्रात किंवा खाडी मासे पकडून, ते विकून गुजराण केली जाते. त्यामधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. मागील आठवड्यात कडाक्याची थंडी आणि हलके वारे वाहू लागल्यानंतर रत्नागिरीतील मच्छीमारांच्या हाती मासाच सापडत नसल्याचे मच्छीमारांनी सांगितले.