
मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्ध पातळीवरील हातात घेण्याच्या खासदार नारायण राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्ध पातळीवरील हे काम हातात घेऊन दर १५ दिवसांनी आढावा बैठक घेऊन मला माहिती द्या, येत्या एप्रिलपर्यंत महामार्गाचे काम झाले पाहिजे, अशा सूचना माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महामार्ग अधिकाऱ्यांना केल्या.आपण रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आजच बोललो असून आवश्यकता वाटल्यास त्यांचा दौरा इथे लावू असेही ते म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आज रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे रत्नागिरीत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध खात्यांमधील अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.मुंबई-गोवा महामार्ग आणि मिऱ्या-नागपूर महामार्गाचा यावेळी खासदार राणे यांनी प्राधान्याने आढावा घेतला.
महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे व्यापारी, व्यावसायिक, पर्यटक, सामान्य वाहन चालक या सगळ्यांनाच त्रास होतो आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या प्रश्नांना आम्ही काय उत्तरे द्यायची, हा प्रश्न आहे. अधिकारी म्हणून कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न करू नका. जो दिरंगाई करतो त्याच्यावर कारवाई करा, नाहीतर गडकरी साहेबांना बोलावून त्याच्यावर जागेवर कारवाई करायला सांगावे लागेल. येत्या एप्रिलपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण झाले पाहिजे. यासाठी १५ दिवसांनी आढावा बैठक घ्या, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांना केल्या.