
कारमधून सीएनजी गॅस लीक झाल्याने हिंदू कॉलनी येथील रहिवाशांचा जीव टांगणीला.
उभ्या असलेल्या कारमधील सीएनजी गॅस लिक झाल्याने हिंदू कॉलनी परिसरात एकच घबराट निर्माण झाली होती. भर रस्त्यात कारमधून सीएनजी गॅस लिक होऊन बाहेर येत होता. अशावेळी स्थानिकांनी नगर परिषद अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केले.
शहरातील हिंदू कॉलनी परिसरात सोमवारी दुपारी एका वॅगनआर कारमधून अचानक सीएनजी गॅस बाहेर पडू लागला. मोठमोठ्याने आवाज येऊ लागल्याने वॅगनआर कार ज्याठिकाणी उभी होती त्यालगत असणार्या घरातून लोकं धावत बाहेर आली. तत्काळ गाडीचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी सीएनजी टाकीच्या बाहेरील नॉबमधून हा गॅस लिक होऊन बाहेर पडत होता.
ही वॅगनआर कार घटनेपुर्वी ८ किलो सीएनजी भरून हिंदू कॉलनीत येऊन उभी राहिली होती. अचानक सीएनजी गॅस लिकेज झाल्याने सार्यांचीच धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेसह एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या परिसरातील विद्युत व घरगुती गॅस पाईपलाईन बंद करून ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. काही वेळानंतर सीएनजी टाकी पूर्णपणे रिकामी झाली आणि सार्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.