रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील स्नॅक सेंटरमध्ये दरोडा टाकणार्यांना शिक्षा.
रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील स्नॅक सेंटरमध्ये चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणार्या दोघा आरोपींना सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली. गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाहिद सादिक मुजावर (३२, रा. धनजीनाका, बेलबाग, रत्नागिरी) याला ७ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड तर त्याचा साथीदार फुरकान यासीन फणसोपकर (३०, रा. कोकणनगर, रत्नागिरी) याला २ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.
रत्नागिरी सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी या खटल्याचा निकाल दिला. जिल्हा सरकारी वकील अनिरूद्ध फणसेकर यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तीवाद केला. खटल्यातील माहितीनुसार २८ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास खुशबू जैपालसिंग बगेल (रा. एमआयडीसी, रत्नागिरी) या एमआयडीसी येथील आपल्या राहुल स्नॅक सेंटरमध्ये नेहमीप्रमाणे आपले काम करत होत्या. त्यावेळी दोन्ह आरोपी दुचाकीवरून (एम.एच. ०८ एएस ४८९२) तिथे आले. खुशबू या कामात व्यस्त असल्याचे पाहून आरोपी फुरकानने तेथील एका गिर्हाईकाला पत्ता विचारण्याचा बहाणा केला.
ही संधी साधत मुख्य आरोपी शाहिदने दुकानात प्रवेश करून खुशबू यांना आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करत तुम्ही या स्नॅक सेंटरमध्ये गुटखा ठेवता म्हणून आम्ही तपासणी करायला आल्याचे सांगितले. त्यानंतर स्नॅक सेंटरमध्ये जबरदस्तीने घुसत फिर्यादीला धक्का दिला. त्यामुळे त्या फ्रीजवर आदळल्या. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी शाहिदने आपल्याकडील चाकू काढून ओरडलीस तर तुला मारेन, अशी धमकी दिली. तसेच स्नॅक सेंटरच्या गल्ल्यातील ४ हजार रुपये काढून घेत साथीदारासह दुचाकीवरून पळून गेला अशी तक्रार खुशबू हिने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केली होती.www.konkantoday.com