मुंबई गोवा महामार्गावर पावशी येथेअपघातात महिलेचा मृत्यू.
मुंबई गोवा महामार्गावर पावशी भंगसाळ नदी पुलानजीक अल्टो कारने प्लेजर दुचाकीला मागून जोरात धडक देऊन झालेल्या अपघातात सौ.वसुंधरा जनार्दन मांजरेकर (56, मूळ रा. मालवण, सध्या रा.वेताळबाबर्डे,तांबेवाडी ता.कुडाळ) यांचा मृत्यू झाला. त्या दुचाकीच्या मागे बसल्या होत्या, तर त्यांचे पती जनार्दन बापू मांजरेकर (61) हे दुचाकी चालवत होते. ते जखमी झाले. त्यांच्यावर ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना रविवारी सायंकाळी 4.15 वाजण्याच्या सुमारास घडली.वरूण आनंद दामले (35 रा.डोंबिवली ) हे अल्टो कारने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होते. तर जनार्दन मांजरेकर प्लेझर दुचाकी घेऊन वेताळबांबर्डे – तांबेवाडी येथून कुडाळच्या दिशेने येत होते. त्यांच्या मोटारसायकलच्या पाठीमागे पत्नी वसुंधरा बसल्या होत्या. पावशी भंगसाळ नदी पुलानजीक त्यांची दुचाकी आली असता अल्टो कारने मागून धडक दिली. यात वसुंधरा या रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापतहोऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.तर जनार्दन यांच्या डोक्याला जखम झाली.
दोन्ही जखमींना कारचालक दामले व त्यांच्या सोबत असलेल्या अन्य एका व्यक्तीने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वसुंधरा यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले.तर जखमी जनार्दन यांनाही अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातच हलविण्यात आले.