मुंबई गोवा महामार्गावर धुक्यामुळे कार चालकाचा ताबा सुटला, कार दरीत कोसळून तिघेजण जखमी.
मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करतेवेळी दाट धुक्यामुळे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून ही कार महामार्गालगत असलेल्या दरीत कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील असुर्डे येथे घडली. यात तिघेजण किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. वैशाली रविंद्र परब (52), अपेक्षा रविंद्र परब (25), प्रज्वल भूषण मालवणकर (26-सर्व गोरेगाव) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. मुंबई-गोरेगाव येथून हे तिघेजण एका कारने गणपतीपुळेकडे जात होते.
मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करतेवेळी ते तालुक्यातील असुर्डे येथे आले असता दाट धुक्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व ही कार महामार्गालगत असलेल्या एका 15 फूट खड्डयात कोसळली. या अपघातानंतर हे तिघेजण त्या कारमध्ये अडकून पडले होते. या घटनेची माहिती सावर्डे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप गमरे, मनिष कांबळे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रेखा मेश्राम, हेडकॉन्स्टेबल रमेश जडयाळ यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या तिघांना कारमधून बाहेर काढून उपचारासाठी लगतच्या खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी स्थानिकही मदतीसाठी धावले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.