पीव्ही सिंधूने बांधली लग्नगाठ, विवाह सोहळ्यातील पहिला फोटो आला समोर!
भारताची बॅडमिंटन क्वीन म्हणून ओळख असलेल्या पीव्ही सिंधूने आपल्या डबल्स पार्टनरबरोबर आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. सिंधू लग्नबंधनात अडकली असून तिच्या विवाहसोहळ्यातील पहिला फोटो समोर आला आहे. माजी वर्ल्ड चॅम्पियन आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूने २२ डिसेंबर रोजी व्यंकट दत्ताबरोबर लग्नगाठ बांधली. या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.
पीव्ही सिंधूने अद्याप इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत. मात्र, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नव्या जोडप्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्यांच्या विवाहाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये सिंधू आणि व्यंकटदत्ता एकत्र बसलेले दिसत आहेत. सिंधूच्या लग्नाचे सर्व विधी दक्षिण भारतीय रितीरिवाजांनुसार पार पडले. सिंधूने गोल्डन क्रीम कलरची साडी परिधान केली आहे आणि दक्षिणात्य परंपरेप्रमाणे दागिनेही परिधान केले आहेत. तर तिचा नवराही पारंपारिक लग्नजोड्यात दिसत आहे. दोघेही हात जोडत गजेंद्र सिंह यांचे आशीर्वीद घेत आहेत.गजेंद्र सिंह यांनी ट्विट केले की, ‘आपली बॅडमिंटन चॅम्पियन ऑलिम्पियन पीव्ही सिंधू आणि व्यंकट दत्त साई यांच्या लग्नसोहळ्याला काल संध्याकाळी (२२ डिसेंबर) उदयपूरमध्ये उपस्थित राहून आनंद झाला. मी या जोडप्याला त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो.
‘सिंधूला आशीर्वाद देण्यासाठी गजेंद्र सिंह शेखावत यांच्याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील पोहोचले होते. सिंधू आणि आयटी व्यावसायिक व्यंकट दत्ता साई यांचा विवाह उदयपूरमधील लेक सिटीच्या मध्यभागी असलेल्या हॉटेल राफेल्समध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नसोहळ्यात फक्त निवडक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. आता २४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये क्रीडा जगताशिवाय, चित्रपट आणि राजकीय जगतातील दिग्गज व्यक्ती देखील उपस्थित राहू शकतात.पीव्ही सिंधूने अद्याप तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत.
याचबरोबर तिचा पती व्यावसायिक व्यंकत दत्ता साई यांचे इन्स्टाग्राम अकाऊंटही प्रायव्हेट आहे. त्यामुळे चाहत्यांना सिंधू तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो कधी शेअर करणार यावर नजरा आहेत. तर सिंधूने व्यंकट दत्ता साईबरोबरचा एक फोटो शेअर केला होता.