राज्यातील देवरायांना मिळणार अधिक संरक्षण, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मालवण:- सर्वोच्च न्यायालयाने देवरायांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातील इतर ठिकाणच्या देवरायांसह सिंधुदुर्गातील १४९७ देवराया आता अधिक संरक्षित होणार आहेत.परंपरागतरित्या संरक्षित देवरायांच्या व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाला दिले आहेत. देवरायांचे पर्यावरणीय आणि सांस्कृतिक महत्त्व जपण्यासाठी देशव्यापी सर्वेक्षण योजना विकसित करण्यास न्यायालयाने सुचविले आहे. पर्यावरण अभ्यासकांनी या निर्णयाचे स्वागत करताना हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे.
सांस्कृतिक आणि जैविक महत्त्व लाभलेल्या देवरायांसारखा महत्त्वाचा अधिवास वाचवणे गरजेचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. देवरायांना वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत समुदाय राखीव क्षेत्राचा दर्जा देण्याबाबतच्या सूचनाही न्यायालयाने केली आहे. न्या. भूषण गवई, न्या. एस. व्ही.एन. भट्टी आणि न्या. संदीप मेहता यांच्या विशेष खंडपीठाने ही शिफारस राजस्थानच्या लुप्त होत चाललेल्या उपवनांवर प्रकाश टाकणाऱ्या याचिकेवर आधारित केली आहे.