रत्नागिरी परीट समाजातर्फे श्री विठ्ठल मंदिरात श्री गाडगेबाबा पुण्यतिथी उत्साहात संपन्न
ज्येष्ठ दाम्पत्यांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी येथील श्री विठ्ठल मंदिरात दिनांक २० डिसेंबर रोजी संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांचा ६८ वा पुण्यतिथी उत्सव उत्साही वातावरणात संपन्न झाला.
यावेळी झालेल्या मेळाव्याला ज्येष्ठ सल्लागार श्री. प्रभाकर कासेकर हे अध्यक्षस्थानी होते. तर ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. शशिकांत मस्के, श्री. मधुकर कदम, सौ. कल्पना नाचणकर, महिला मंडळ अध्यक्ष सौ.संगीता कासेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते श्री.व सौ. सुषमा प्रभाकर कासेकर आणि श्री. व सौ. शिल्पा शशिकांत नाचणकर या ज्येष्ठ दाम्पत्यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संत गाडगेबाबा नगर येथील संत गाडगेबाबा समाज मंदिराच्या नूतनीकरण कामात विशेष योगदान देणाऱ्या श्री. प्रीतम पावसकर यांचाही सत्कार करण्यात आला.या समाज मंदिरासाठी श्री प्रसाद कासेकर यांनी भिंतीवरील घड्याळ भेट म्हणून मंडळाला दिले.
श्री गाडगे बाबांच्या जीवनावर बाल गटात आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व, हस्तकला आणि चित्रकला स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थीनी, विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात बक्षीसे देऊन गौरव करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेत कुमारी शिवन्या वीरेंद्र कोरगावकर, आर्यन प्रसाद म्हस्के, वेद निलेश तवसाळकर, कुमारी हिरा अमित नेरकर यांना विशेष बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. विविध क्षेत्रात प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात आला.सकाळी श्री गाडगे बाबा मूर्ती पूजनाच्या कार्यक्रमाचा मान श्री. राजेश कदम आणि सौ. संपदा कदम यांना देण्यात आला.
त्यानंतर संजीवनी गुरुप्रसाद मंडळाच्या बाल कलाकारांनी सुश्राव्य भजने सादर करून भक्त मंडळींची प्रशंसा मिळविली. सायंकाळी श्री. सतीश बुवा पांचाळ यांच्या भजनानंतर तसेच श्री. दत्तात्रय जोशी यांच्या भक्ती आणि भावगीत कार्यक्रमानंतर धुपारतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संत गाडगेबाबा नगरात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेतून समृद्धीचा संदेश देण्यात आला. या उपक्रमांच्या नियोजनात मंडळाचे पदाधिकारी सर्वश्री जितेंद्र नेरकर, प्रसाद म्हस्के, सचिन म्हस्के, अमित कोरगावकर, सागर कासेकर आदीनी परिश्रम घेतले.