पुण्याहून महाडला जाणाऱ्या बसला; चौघांचा मृत्यू, 25 जखमी
रायगड-माणगाव पुणे मार्गावर ताम्हीणी घाटामध्ये वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. ही खासगी बस रस्त्यावरुन खाली उतरुन डोंगर कड्याच्या बाजूला पडली.या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताचं गांभीर्य पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.ताम्हीणी घाट उतरताना बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर ही बस रस्ता सोडून बाजूला असलेल्या खड्ड्यात पडली. सुदैवाने बाजूला एक मोठा खडक असल्याने बस दरीत पडली नाही. ही बस पुणे येथून महाड तालुक्यातील बिरवाडीकडे जात होती. एका लग्न समारंभासाठी पुण्यातील वऱ्हाडी या बसमधून महाडच्या दिशेने प्रवास करत होते. माणगाव पोलीस अपघातस्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक यंत्रणेकडून मदत कार्य सुरू आहे.