
नितीन गडकरी यांचा आमच्यावर काय राग आहे ते आम्हाला माहिती नाही- शिवसेना आमदार भास्कर जाधव.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग सुरू झाला. कोकण ग्रीन फिल्ड मार्गाचे काम सुरू आहे. पण 2011 मध्ये सुरू झालेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.डिसेंबर महिन्यात हा महामार्ग सुरू होईल, असे आश्वासन प्रत्येक मंत्री देत असतो. पण हा महामार्ग कधी सुरू होईल हे आजही सांगता येणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी आज संताप व्यक्त केला.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना भास्कर जाधव यांनी या महामार्गाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. या राज्यातील व या देशातील सर्वात रखडलेला महामार्ग हा मुंबई-गोवा महामार्ग आहे. 2011 मध्ये या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. या सभागृहात या महामार्गावर अनेकदा चर्चा झाली आहे. त्यावर प्रत्येक मंत्र्यांचे आश्वासन ठरलेले असते की येत्या डिसेंबर महिन्यात हा महामार्ग पूर्ण होईल.
2011 पासून आज 2024 चा डिसेंबर महिना संपत आला, पण तरीही महामार्ग पूर्ण झालेला नाही.वास्तविक हा महामार्ग प्राधान्याने व्हायला हवा होता. पण पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आमच्यावर काय राग आहे ते आम्हाला माहिती नाही. मी त्यांची अनेकदा भेट घेतली. या रस्त्याबद्दल अनेकांच्या शिव्या खाल्या असे गडकरी यांचे वाक्य ऐकले आहे. यावर एक पुस्तक लिहून होईल, असेही ते म्हणाले. पण नक्की काय झाले? कशामुळे एवढी अडचण आली? आम्ही काय केले पाहिजे? हे गडकरींनी आमच्यासमोर येऊन सांगावे.
मी त्यांना अनेकदा विनंती केली की, तुम्ही पनवेलला उतरा आणि पनवेलवरून एक व्हॅनिटी व्हॅनमधून फक्त चिपळूणपर्यंत माझ्याबरोबर चला. तेव्हा तुम्हाला रस्त्याची वस्तुस्थिती कळेल. वास्तविक मुंबई-गोवा महामार्गावरील सध्याच्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे फक्त रुंदीकरण आहे. यात फक्त कशेडी घाटात नवीन बोगदाकाढलेला आहे. माणगाव व इंदापूर शहराच्या बाहेरून एक रस्ता काढायचा आहे. पण कशेळी घाटातील बोगद्याची एक मार्गिका सुरू झाली याकडे भास्कर जाधव यांनी लक्ष वेधले.