चिपळूण शहरातील रखडलेल्या बस स्थानकाच्या विरोधात आमदार शेखर निकम यांनी आवाज उठविला.
रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती चिपळूण बसस्थानकाचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून याकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी चिपळूण मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.आमदार शेखर निकम यांनी परिवहन विभागातील चर्चे दरम्यान औचित्याचा मुद्दा मांडून चिपळूण आगाराची व्यथा सभागृहात उघड केली. आमदार निकम म्हणाले, चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक इमारत नुतनीकरणाचे काम मे २०१८ पासून सुरू करण्यात आले आहे.
परंतु आता सहा वर्षे होत आली तरी अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील हे महत्वाचे बसस्थानक असूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी पसरली आहे.नव्याने हायटेक पद्धतीने बांधत असलेल्या या इमारतीच्या कामाला सहा वर्षे पूर्ण होत आली तरी अद्याप पायाभरणीचे काम पूर्ण झालेले नाही हे दुर्भाग्य आहे. गेली सहा वर्षे बसस्थानकाचा कारभार पत्र्याच्या शेडखाली सुरू आहे.