बीआयएस मानांकन आणि प्रमाणन प्रक्रिया कार्यशाळा संपन्न
रत्नागिरी, दि.19 :- केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय व जिल्हा पुरवठा विभाग आणि भारतीय मानक ब्युरो मुंबई शाखा कार्यालय-II यांच्या संयुक्त विद्यमाने बीआयएस मानांकन आणि प्रमाणन प्रक्रिया याबाबत कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेला जिल्हा पुरवठा अधिकारी एम.बी.बोरकर, उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, पोलीस उप अधिक्षक राधिका फडके, शिक्षणाधिकारी किरण लोहार, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, सहायक नियंत्रक वैधमापन शास्त्र सु.रा.जोरवेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, वैज्ञानिक ई तथा प्रमुख (मुंबई शाखा कार्यालय-II) प्रेम सजनी पटनाला, वैज्ञानिक डी / संयुक निदेशक महेंद्र सिंह जाखड, वैज्ञानिक सी / उप निदेशक अनुराग आदी उपस्थित होते.
बाजारात विकत मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूची आपण किंमत अदा करतो त्या वस्तूच्या दर्जाची पडताळणी करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. हा दर्जा पडताळणी करताना कोणते निकष असावेत याची माहिती आजच्या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. ही माहिती सर्वांसाठी उपयुक्त असून वस्तूच्या दर्जाबाबत सर्वांनी जागरुक असणे गरजेचे आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. बोरकर यांनी सांगितले.श्रीमती पटनाला यांनी सांगितले देशात रोजच्या उपयोगातील वस्तू, बांधकामासाठी वापरण्यात येणारी संसाधने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, लॅपटॉप, लहान मुलांची खेळणी यासारख्या 685 वस्तूंसाठी 26 हजार मानके आहेत. या वस्तूंच्या उत्पादकांना वस्तूचे उत्पादन, साठवण, विक्री ही भारतीय मानक ब्युरो अंतर्गत असलेल्या नियमानुसार करणे बंधनकारक आहे.
सोने व चांदी खरेदी करताना हॉलमार्कचे दागिने खरेदी करावेत जेणेकरुन सोने खरेदीच्या वेळी होणारी फसवणूक टाळता येईल. BISCARE या मोबाईल ॲप तसेच www.bis.gov.in या संकेतस्थळावर भारतीय मानक ब्युरो अंतर्गत असणारी उत्पादकांची माहिती तसेच एखाद्या वस्तू अथवा सेवेबाबत ग्राहक आपली तक्रार नोंदवू शकतात अशी माहिती त्यांनी दिली. कार्यशाळेला पॉवरपाँईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देण्यात आली