घरगुती स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांमध्ये नाराजी,वाढीव बिलाबाबत बेस्ट प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी!

मुंबई : मुंबईत अनेक घरांमध्ये स्मार्ट विद्युत मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, हे मीटर बसवल्यापासून वाढीव वीज बिल येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. परिणामी, ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे विद्युत मीटर बसविण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांना पत्र पाठवून केली आहे.

मुंबईत बहुतांश घरांमध्ये अदानी कंपनीमार्फत विद्युत स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, या विद्युत मीटरमुळे वाढीव बिल येत असल्याच्या तक्रारी बेस्ट उपक्रमातील वीजपुरवठा विभागाकडे करण्यात येत आहेत. या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने गेल्या आठवड्यात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते आमदार अनिल परब यांनी अंधेरीतील अदानी कार्यालयाला भेट दिली होती. वाढीव बिल येत असल्याने ते काढून टाकावेत, अशी मागणी त्यांनी अदानी कंपनीतील अधिकाऱ्यांकडे केली होती. मुंबईत विद्युत स्मार्ट मीटर बसविण्याची घोषणा झाली, तेव्हापासूनच या निर्णयाला विरोध होत होता. राजकीय पक्षांनीही याबाबत विरोधी भूमिका घेतली. विद्युत स्मार्ट मीटरमुळे येत असलेल्या वाढीव बिलाच्या समस्येचा भाजप पदाधिकारीही गांभीर्याने विचार करत आहेत. वाढीव बिलामुळे घरगुती वीज ग्राहकांना नाहक वाढीव भुर्दंड सोसावा लागत आहे.

त्यामुळे बेस्ट प्रशासनाने याबाबात पुर्नविचार करावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.बेस्ट प्रशासनाला प्राप्त झालेल्या तक्रारींची खातरजमा करावी, तसेच, त्याबाबत योग्य कार्यवाही करावी, तसेच, कार्यवाहीच्या तपशीलवाराची माहिती द्यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, रवी राजा, भालचंद्र शिरसाट, कमलेश यादव आणि राजश्री शिरवडकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र डिग्गीकर यांना पाठवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button