कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचा २८ डिसेंबर रोजी २८ वा वर्धापन दिन कार्यक्रम नवनिर्माणचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांची प्रमुख उपस्थिती
रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा २८ वा वर्धापन दिन शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता ते दुपारी १.३० वाजता या वेळेत ज्येष्ठ नागरिक भवनात विविध उपक्रमाने संपन्न होणार आहे. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. अभिजीत हेगशेट्ये यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते वयाची ७५ वर्षे आणि ८५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा तसेच वैवाहिक जीवनाची ५० वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक जोडप्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय डिसेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचाही शुभेच्छापत्र आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
दैनिक लोकमतच्या सीनियर सब एडिटर श्रीमती शोभना कांबळे यांना आदर्श महिला पत्रकार म्हणून यावेळी सन्मानित केले जाणार आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यश संपादन केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या पाल्यांचा आणि गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे.
वर्धापन दिनानिमित्त सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली असून सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत तीर्थप्रसादाची वेळ आहे. दुपारी सभासदांसाठी स्नेहभोजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वर्धापन दिन कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे आणि उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम यांनी केले आहे.