पदार्थांच्या किंमतीत वाढ झाल्याने पोषण आहारालाही महागाईच्या झळा.
स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनात १ हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र पूर्वीच्या दरानेच मानधन दिले. तांदळाच्या खिरीचे चार महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत. शासनाकडून जाहीर केलेले व दर शनिवारी द्यावयाचे नाचणीचे सत्व अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. विविध पदार्थांच्या किंमतीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशा विविध समस्या आणि महागाईच्या झळा पोषण आहाराला बसत आहेत.
स्वयंपाकी व मदतनीस यांना केंद्र सरकारकडून ६०० व राज्य सरकारकडून १९०० असे मिळून मासिक २५०० रुपये मानधन दिले जाते. ऑगस्ट २०२४ मध्ये राज्य शासनाने १००० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र २५०० रुपयेच मानधन दिल्यामुळे स्वयंपाकी व मदतनीसांमध्ये शासनाने फसवल्याची भावना निर्माण झाली आहे. ऑगस्टच्या आठवड्यापासून चार दिवस तांदळाची खीर तसेच दुसर्या व चौथ्या शनिवारी गोड भात देणे बंधनकारक केले आहे.
यासाठी लागणारी साखर, दूध पावडर यासाठी संबंधित ठेकेदाराने पैसे घालावेत, असे सांगितले आहे. एक किलो तांदळामागे ७५० ग्रॅम दूध पावडर व ८०० ग्रॅम साखर असे प्रमाण निश्चित केले आहे. गेले चार महिने ठेकेदार खीर देत आहेत. त्याचे पैसे कधी येणार? ते कोणत्या दराने येणार? याची माहिती शासनाकडून अद्याप दिलेली नाही.www.konkantoday.com