चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम मार्गी लागण्याची शक्यता, कामासाठी चार टीम कार्यरत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहरातून जाणार्या उड्डाण पुलाच्या जुन्या पिलर कॅप तोडण्याचे काम अखेर पूर्ण झाल्यानंतर आता एकाचवेळी दोन बाजूने नवीन पिलरचे काम सुरू केले आहे. त्यासाठी चार टीम कार्यरत केल्या असून काही टीम मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम येत्या काही महिन्यात मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.चिपळुणातील उड्डाण पुलाच्या कामासाठी दोन वर्षे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र या कामात तितक्याच अडचणी येत आहेत. या पुलासाठी सुरूवातीच्या आराखड्यानुसार एकूण ४६ पिलर उभारण्यात आले होते.
त्यानंतर पुढील कामाला वेग येत असतानाच १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा बहाद्दूरशेख नाका येथे काही भाग कोसळला. पूल कोसळल्यानंतर उभारणीतील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या. त्यावर केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली. या समितीच्या सुचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या डिझाईनमध्ये बदल केले. यामध्ये पूर्वीचे पिअरमधील ४० मीटरचे गाळे रद्द करून त्यामधील अंतर कमी करण्यासाठी २० मीटरवर नव्याने पिलर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत बहुतांशी पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे.www.konkantoday.com