
रत्नागिरीत दुकान फोडणार्या चौघांच्या मुसक्या गोव्यातून आवळल्या
रत्नागिरी ः शहरातील दुकान फोडणार्या चौघांच्या मुसक्या पोलिसांनी गोवा येथून आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कमही जप्त केली आहे. शहरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले. संशयित गोवा राज्यातील कलंगुट राज्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शहर पोलिसांचे पथक तातडीने तेथे रवाना झाले होते. तेथील पोलिसांची मदत घेऊन या पथकाने चार संशयितांना ताब्यात घेतले. मोहम्मद अब्बास (वय 27, रा. कानपूर उत्तरप्रदेश), फिरोज इसरार आलम (वय 48, रा. उत्तरप्रदेश), मोहम्मद सुफियान मोहम्मद अझरुद्दीन मोहम्मद हनिफ (वय 22, रा. कासीमनगर उत्तरप्रदेश) यांच्यासह एका विधी संघर्षित बालकाचा यात समावेश आहे. याबाबत निर्मल रमेश ओसवाल (वय 33, रा.आठवडा बाजार, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली होती. शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी आठवडा बाजार येथील यश ट्रेडर्स नावाचे दुकान फोडून रोख 32 हजार रुपये चोरुन नेले होते.
चोरट्यांना पकडण्याची ही कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर पोलिस अधिकारी जयश्री देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाचे अंमलदार पोलिस हेड काँस्टेबल प्रवीण बर्गे, पोलिस नाईक अमोल भोसले, पंकज पडेलकर, आशिष भालेकर तसेच रत्नागिरी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक दीपराज पाटील, मंदार मोहिते अशा पथकाने सहभाग घेऊन केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस फौजदार सुनील चवेकर करत आहेत.