अभंग गायन स्पर्धेसाठी १० जणांची निवड,पावस येथे २३ ला अंतिम फेरी.
पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे आयोजित श्रीमत् संजीवनी गाथा राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या प्राथमिक फेरी राज्यभरातील ६ केंद्रावर पार पडल्या असून, एकूण १० स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.अंतिम फेरी स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव कार्यक्रमादरम्यान २३ डिसेंबरला दुपारी ३ वाजता समाधी मंदिराच्या रंगमंचावर पार पडेल.स्वामी स्वरूपानंद रचित संजीवनी गाथा या ग्रंथरूपी पुस्तकातील अभंगांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने संजीवनी गाथेतील अभंगांची राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धा श्री स्वामी सेवा मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येते. यावर्षीची प्राथमिक फेरी नुकतीच रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे आणि अकोला येथील केंद्रांवर पार पडली. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी निवड झालेले केंद्रनिहाय गुणानुक्रमे स्पर्धक पुढीलप्रमाणे : मेघना जोशी, मधुरा गोडबोले (पुणे), सृष्टी तांबे, गौतमी वाडकर (रत्नागिरी), अमर पाटील, सचिन जाधव (कोल्हापूर), भाग्यश्री पालकर-पावसकर, निळकंठ आंबये (मुंबई), चैतन्य फाटक, नंदन जोशी (ठाणे). या स्पर्धकांमध्ये अंतिम फेरीत स्पर्धा होईल. यातून राज्यस्तरीय विजेते निवडण्यात येतील.