“त्यांच्याबद्दल मला फार वाईट वाटलं”, भुजबळांच्या प्रश्नावर नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीमधील अनेक दिग्ग्ज नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचादेखील समावेश आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. तसेच ते नवीन राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलल जात आहे. यादरम्यान शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भुजबळांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ नाराज आहेत आणि राजकीय भूमिका घेत तुमच्याकडे परत आले तर तुम्ही स्वागत कराल का? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ते काही बोलले तर मी त्यावर उत्तर देईन, आपण कशाला त्यावर काही बोलावं. भुजबळांबद्दल मला फार वाईट वाटलं. असं अनेक जणांबद्दल मला आतून वाईट वाटतंय. एका अपेक्षेने तिकडे गेले होते. बरं काही जणांना बरं घट्ट झालेली जाकेट आतातरी घालयला मिळालं. अशी बऱ्याचं जणांची जॅकेटं वाट बघत असतील अशा सर्वांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मंत्रिमडळात महायुतीतील अनेक दिग्गज नेत्यांना स्थान मिळालं नाही, या पार्श्वभूमीवर लाडका आमदार किंवा लाडकी माणसं अशी काही सरकारची योजना आहे का? असा खोचक सवाल देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ यांनी “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना” असं सूचक विधान केलं होतं. याबद्दल उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला, यावर हसून उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “या सरकारची झालीय दैना त्यामुळे तिकडे चैना, मैना असं काही होणार नाहीये, वहाँ नहीं रहना हे त्यांचं योग्य आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारातराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान दिलेलं नाही. यानंतर छगन भुजबळ यांच्यासह समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. नाराज छगन भुजबळांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की तुम्ही आता नागपूरमधील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नाही का? पक्षाने डावलल्यानंतर तुमची आता पुढची भूमिका काय असेल? यावर भुजबळ म्हणाले, “आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”.