जय श्रीरामच्या घोषणा देत सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी; फेसबुक पोस्ट करत सांगितले पहाटे ३ वाजता काय घडले!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नागपूर विमानतळावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत सुषमा अंधारे यांनी स्वत: फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी अनेक धक्कादायक दावे करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर राज्यात दहशत आणि दबाबतंत्राचे गलिच्छ राजकारण सुरू असल्याचेही अंधारे यांनी म्हटले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशा परिस्थितीत ही घटना घडल्यामुळे याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
ही संपूर्ण घटना सांगताना शिवसेना (उद्धव ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, “परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेर संघर्ष सुरू आहे. अशातच आत्ता ३ वाजून ३६ मिनिटांनी (पहाटे) नागपूर विमानतळावर बाहेर पडण्यासाठी असलेल्या फाटकाजवळ विचित्र घटना घडली. मी आणि माझी ७ वर्षांची लेक समता सैनिक दलाच्या स्मिता कांबळे यांच्याबरोबर होते. साधारण ६ फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमीप्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणून वर बघितले तर तो जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. गेटवरील सुरक्षारक्षक थोडे पुढे सरसावले, तसा तो जय श्रीरामच्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला.”
सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत या प्रकरणाचा तपास करावे असे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, “देवेंद्रजी, आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पाहावी. हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खूप वेळा वाटले. मात्र, दहशत आणि दबावतंत्राचे हे गलिच्छ राजकरण मुख्यमंत्री म्हणून आपल्यापर्यंत पोहचवणे ही नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे असे वाटले.”
यावेळी अंधारे यांनी #टीप असे लिहित म्हटले की, “शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही. कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही. बाकी आपली मर्जी.”