
खासदार राहुल गांधी हे आपले मित्र रायन बनाजी यांच्या अंत्यविधीसाठी महाबळेश्वरला.
संसदेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे आपले मित्र रायन बनाजी यांच्या अंत्यविधीसाठी काल महाबळेश्वरला आले होते. मित्राच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून विधी पूर्ण होईपर्यंत ते थांबले होते.राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बनाजी यांच्या पार्थिवाचा पारशी स्मशानभूमीत दफनविधी झाला. सर्व सोपस्कार उरकूनच राहुल गांधी दुपारी पुण्याला रवाना झाले.मुंबई येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. बनाजी यांनी २० ते २२ वर्षांपूर्वी राहुल गांधी यांच्या डोळ्यांवर उपचार केले होते. तेव्हापासून गांधी व बनाजी कुटुंबीयांमध्ये कौटुंबिक नाते निर्माण झाले होते. ते दोन्ही घरांनी जपले होते. डॉ. बनाजी यांचे चिरंजीव रायन हे राहुल गांधी यांचे मित्र होते. पोतुर्गालची राजधानी लिस्बनमध्ये काही दिवसांपूर्वी जीममध्ये व्यायाम करत असताना रायन यांना हृदयविकाराचा झटका आला. निधनापूर्वी रायन यांनी आपला अंत्यविधी महाबळेश्वरला व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार डॉ. बनाजी यांनी आपला मुलगा रायन यांचे पार्थिव महाबळेश्वरला शापूर हॉल या बंगल्यावर आणले. सोमवारी दुपारी साडेबाराला रायन यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, असे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. आपल्या मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी राहुल गांधी यांनी महाबळेश्वरला येण्याचा निर्णय घेतला.महाबळेश्वरला येण्यासाठी रविवारी रात्री राहुल गांधी यांचे पुण्यात आगमन झाले. काल सकाळी पुण्याहून पोलिस बंदोबस्तात राहुल गांधी यांचा महाबळेश्वरचा प्रवास सुरू झाला. रायन बनाजी यांचे पार्थिव ठेवलेल्या बंगल्यावर सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.काल सकाळी साडेनऊला राहुल गांधी यांचे महाबळेश्वरला आगमन झाले. त्यांनी रायन यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व बनाजी कुटुंबीयांचे सांत्वन केले. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत विधी पार पडला