तिसऱ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या खेडमधील नव्या लखोबा लोखंडे याला अटक.
दोन मुलींशी लग्न केल्यानंतर तिसरीसोबत लग्नाची सुपारी फोडली आणि चौथीसोबत पुन्हा लग्नाची बोलणी सुरू केली. या खऱ्या आयुष्यातल्या लखोबा लोखंडेला अटक करण्यात आली आहे. माथेरानजवळच्या नेरळमध्ये हा प्रकार घडला आहे.यातील आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे फसवणूक झालेली एक महिला ही पोलीस कॉन्सटेबलच आहे. योगेश यशवंत हुमने असं महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याचं नाव आहे.
33 वर्षांचा योगेश हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील जामगे खेडमधील आहे. योगेशने आतापर्यंत अनेक मुलींची फसवणूक करूने त्यांना लाखो रुपयांना लुबाडल्याचं पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलं आहे. यातल्याच एका महिलने योगेशविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.योगेश हा सोशल मीडियाचा वापर करून महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा आणि त्यांच्यासोबत बोलून ओळख वाढवायचा. महिलांचं लग्न झालेलं तर नाही ना हेही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून हेरायचा. जवळीक वाढल्यानंतर योगेश मुलींना लग्नाचं आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करत होता. विवाहित असूनही योगेश आपण अविवाहित असल्याचं मुलींना सांगायचा.
दोन मुलींसोबत लग्न केल्यानंतर त्याने तिसरीसोबत लग्नाची बोलणी केली, एवढच नाही तर लग्नाची सुपारीही फोडण्याचा कार्यक्रमही धुमधडाक्यात करण्यात आला. यानंतर चौथीसोबत बोहल्यावर चढण्याच्या तयारीत होता, यासाठी त्याने लग्नाची बोलणीही सुरू केली, पण फसवणूक झालेल्या एकीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर योगशेचं बिंग फुटलं आणि त्याला पोलिसांनी अटक केली.