जयगड वायु गळती प्रकरणी डिस्चार्ज दिलेली १७ मुले आज पुन्हा रुग्णालयात दाखल.
जिंदाल पोर्ट कंपनीच्या परिसरात असलेल्या वायू गळतीमुळे जयगड माध्यमिक विद्यामंदिर येथील ७० विद्यार्थी बाधित झाले होते. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. ही घटना गुरुवारी दुपारी घडली होती; परंतु त्यापैकी १७ विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्यामुळे आज (१६ डिसेंबर) पुन्हा रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलांना पोटदुखी, श्वसनाचा, डोकेदुखीचा त्रास होऊ लागला आहे. मुलांना कोणताही धोका नाही, परंतु त्यांच्या लक्षणाप्रमाणे त्यांच्यावर काटेकोर उपचार सुरू आहेत, अशी माहिती परकार हॉस्पिटलचे मुख्य डॉ. अमित पंडोले यांनी दिली.
उपचार घेऊन गेलेल्या मुलांपैकी दोन दिवसात सुमारे १७ मुले पुन्हा परकार हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहेत. या मुलांना पुन्हा श्वसनाचा, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे पालकांनी त्यांना दाखल केले आहे. यामुलांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. त्यांचे रिपोर्ट निल आहेत, परंतु त्यांना होणाऱ्या त्रासाप्रमाणे त्यांच्यावर उपचार सुरू आहे, असे डॉ. पंडोले यांनी सांगितले.