आचरा गावची गावपळण आज रविवार, 15 डिसेंबरपासून सुरू होणार.
परंपरा असलेल्या व प्राचीन शिवस्थान असलेल्या आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या दर तीन किंवा पाच वर्षांनी होणार्या गावपळणीला रविवार, 15 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.बुधवार, 18 डिसेंबरपर्यंत तीन दिवस, तीन रात्री गावपळण होणार आहे. 18 डिसेंबरला इनामदार श्री देव रामेश्वराचा कौल न झाल्यास गुरुवारी 19 डिसेंबर रोजी गाव भरणार आहे. गावपळणीच्या या अनोख्या प्रथेला रामेश्वराने कौल (आदेश) दिल्याने आचरा गावची गावपळण आज रविवार, 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
दर तीन वर्षांनी देवदीपावली दिवशी गावपळणीचे वर्ष असल्यास श्री देव रामेश्वरास गावपळण करण्याविषयी कौल लावण्यात येतो. यावर्षी रामेश्वराने क्षणाचा विलंब न लावता लगेच कौल दिल्याने यावर्षी आचरा गावची गावपळण होत आहे. मागील वेळी गावपळण डिसेंबर 2019 साली झाली होती. गावपळण का केली जाते याविषयी अनेक कथा, दंतकथा असल्या तरी आजच्या आधुनिक काळातसुद्धा रामेश्वरावर श्रद्धा ठेवून आचरा गावातील लोक गावाच्या सीमेबाहेरझोपड्यांमध्ये वास्तव्य करून राहणार आहेत.
गावपळणीच्या तीन दिवसात कराव्या लागणार्या वास्तव्यामुळे आचरा गावच्या सीमेबाहेर विविध ठिकाणी लोकांनी झोपड्या उभारल्या आहेत. सुमारे 8000 लोकवस्तीचा बारा वाड्यांचा गाव रविवारी इनामदार श्री देव रामेश्वराचा ममहादरवाजा, दिंडी दरवाजा व मुख्य प्रवेशद्वार रामेश्वर संस्थानच्या बारापाच मानकर्यांनी बंद केल्यानंतर दुपारी 2. च्या सुमारास खाली होणार आहे.