
अपघाताचे प्रकार सुरू असतानाच भिवंडी-रत्नागिरी एसटी सुसाट चालवणार्या चालकाला प्रवाशाने रोखले.
कुर्ला बेस बस प्रकरण ताजे असतानाच सुसाट गाडी मारणार्या एसटी बस चालकाने प्रवाशांच्या पोटात गोळा आणल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी सायंकाळी समोर आला. भिवंडी-रत्नागिरी एसटी बसमध्ये हा प्रकार घडला. मुंबई ते चिपळूण दरम्यान चालकाच्या धूमस्टाईलचा थरार अनुभवलेल्या प्रवाशांनी चिपळूण आगारात तब्बल अर्धा तास बस थांबवून ठेवत व्यवस्थापकांकडे त्याची तक्रार केली. अखेर आपली चूक मान्य करीत पुढचा प्रवास सावकाश करतो, अशी त्याने ग्वाही दिल्याने ती बस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.भिवंडी आगारातून सुटलेली भिवंडी-रत्नागिरी ही बस सायंकाळी चिपळूण आगारात आली.
या वेळी सुटकेचा निःश्वास टाकत एक प्रवासी धावतच थेट चिपळूण आगार व्यवस्थापकांच्या केबिनमध्ये गेला. बस चालक अतिवेगाने एसटी चालवित आहे. मार्गावरचे चढ, उतार, वळणावरही तो सुसाट गाडी मारत आहे. यामुळे आमच्या प्रवाशांच्या पोटात गोळा आला असून एखादा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण? प्रवासी जीव मुठीत घेवून इथवर आले आहेत. पुढे काय होईल, काहीच कल्पना नाही. तुम्ही दुसरा चालक द्या, अशी विनवणी त्या प्रवाशाने आगार व्यवस्थापक श्री. चव्हाण यांना केली.
बसमधील अन्य प्रवासीही चालकाच्या अशा वागण्याने संतापलेले होते. या तक्रारीची तत्काळ दखल घेत श्री. चव्हाण यांनी भिवंडी-रत्नागिरी एसटीचे चालक शिरसाट यांना बोलावून घेतले. त्याचा जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. भिवंडी आगारातल वरिष्ठांकडेही त्याची तक्रार केली. अखेर त्या चालकाने आपली चूक झाल्याचे कबूल केले.
मी या मार्गावर पहिल्यांदाच आलो आहे. पुढे सावकाश एसटी नेईन, अशी ग्वाही दिली. त्यानुसार त्याला समज देवून अर्ध्या तासानंतर ती बस चिपळूण आगारातून सोडण्यात आली. www.konkantoday.com