गगनगडावर दरवर्षीप्रमाणे आज दत्त जयंतीचा सोहळा,विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनगडावर दरवर्षीप्रमाणे शनिवार (ता.१४) दत्त जयंतीचा सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, दत्तजन्म सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती व्यवस्थापक रमेश माने, बापूसाहेब पाटणकर, संजय पाटणकर यांनी दिली.दत्त जयंतीनिमित्त गगनगडावरील परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या आश्रमात भाविकांची मांदियाळी जमू लागली आहे.
पाटण ते गगनगड, मनोरी व तळकोकणातून आलेल्या पायी दिंड्या गगनगडावर दाखल झाल्या आहेत. १३ ते १६ डिसेंबर असे सलग चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवार दत्त जयंतीचा मुख्य सोहळा गगनगड पठारावर साजरा होणार आहे. महारुद्र आरंभ, महाप्रसाद, आरती, स्वामी गगनगिरी महाराजांचा पालखी सोहळा, दत्त जन्मसोहळा, मंत्रपुष्पांजली, रात्री कोल्हापूरचे दिग्दर्शक राजेंद्र मेस्त्री यांचा ‘अवघा रंग एक झाला’ हा नाद सुरमई कार्यक्रम आयोजित केला आहे.