
ओझरखोल येथील मिर समीर मुळ्ये या विद्यार्थ्यांने झोप आल्यास बझर वाजणारा चष्मा केला तयार.
वाहन चालवताना अनेक वेळा डोळ्यावर झोप येऊन अपघात होत असतात. यावर संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल येथील विद्यार्थ्यांने झोप आल्यास बझर वाजणारा चष्मा तयार केला आहे. मिर समीर मुळ्ये याच्या या वैज्ञानिक उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.मिर हा तालुक्यातील बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयात सातवीचे शिक्षण घेत आहे. विज्ञान उपक्रमांतर्गत हे ‘झोप आल्यावर बझर वाजवणारा चष्मा’ उपकरण तयार केले आहे. या चष्म्याचा वापर झाल्यास अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. अनेक अपघात रात्री व पहाटेच्या वेळी होतात.
हे अपघात चालकाला झोप आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात अनेकवेळा जीवित हानी होत असते. याचा विचार करुन मिर याने नियमित शालेय अभ्यास करताना त्याने आपल्या या अनोख्या चष्मा संकल्पनेला चालना दिली. यात त्याने इंटरनेटवर शोधून तसेच वाचनातून आढळून आलेल्या बाबींचा उपयोग करुन डोळ्यावर झोप येताच जागे करणारा चष्मा बनवण्यात यश मिळवला आहे.हे उपकरण त्याने तयार करुन शालेय विज्ञान प्रदर्शनात मांडले.
या उपकरणाचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले. यामुळे मिरच्या उपक्रमाला यश मिळाले आहे. मिरने आपले हे उपकरण प्रदर्शनात मांडत असताना त्याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले आहे. त्याच्या या उपक्रमाबाबत सर्वांनीच प्रशंसा केली.