राजापूर मध्ये वावर असलेल्या त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा आमदार किरण सामंत यांच्या वनविभागाला सूचना
गेले काही दिवस राजापूर शहर परिसरात तसेच बाजारपेठ भागात बिबटयाच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर गुरूवारी राजापूर शहरातील नागरिकांच्या वतीने माजी नगराध्यक्ष हनिफ काझी यांनी आमदार किरण सामंत याना लेखी निवेदन देवून या बिबटयाचा बंदोबस्त करण्याबाबत या तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली.
याची तात्काळ दखल घेत आमदार किरण सामंत यांनी राजापूर वनपाल जयराम बावदाने यांना याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेले काही दिवस राजापूर शहर परिसरात बिबटयाचा मुक्त संचार सुरू आहे. हा बिबटया शहरातील भटाळी, पंचायत समिती परिसर, बाजारपेठ या भागात फिरताना नागरिकांना दिसून आले आहे. रात्री 11.30 नंतर मंगळवारी भर बाजारपेठेत या बिबटयाचे दर्शन झाले. यामुळे नागरिक, व्यापारी यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत वनविभागाने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. गुरूवारी आमदार किरण सामंत यांची राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, शिवसेना शहर प्रमुख सौरभ खडपे, महिला आघाडीच्या साजिया काझी गिरकर, ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर यांनी भेट घेवून या बिबटयाचा बंदोबस्त करण्याबाबतचे लेखी निवेदन आमदार सामंत यांना दिले.