
लांजात मुंबई-गोवा महामार्ग ठेकेदार-अधिकार्यांची बैठक वादळी ठरली
लांजा शहरात रखडलेल्या सर्व्हिस रोड, गटार आणि पाईपलाईनच्या कामावरून लांजा तहसील कार्यालय आयोजित बैठकीत लांजावासियांनी ठेकेदार कंपनीचे अधिकारी आणि महामार्ग अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. ही कामे होत नसतील तर सर्वच काम बंद ठेवा असा आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, पुढील ८ दिवसात ही कामे मार्गी लावण्याची डेडलाईन महामार्ग अधिकारी व ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांना देण्यात आली.लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून सध्या पावसाळ्यात सुरू असलेल्या कामांमुळे लांजावासियांना चिखलातून पायपीट करावी लागत असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालय लांजा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत लांजा तहसीलदार प्रमोद कदम, महामार्ग विभागाचे उपअभियंता आर. पी. कुलकर्णी, सल्लागार अधिकारी प्रशांत पाटील, ईगल इन्फ्रा कंपनीचे जयंतीलाल सितलानी तसेच लांजा नगर पंचायतच्या मुख्याधिकारी हर्षला राणे, नगराध्यक्ष मनोहर बाईत आदी उपस्थित होते. www.konkantoday.com