जिंदाल कंपनी विरुद्ध ग्रामस्थ संतापले, कंपनी व्यवस्थापन अथवा जबाबदार व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी.
जिंदाल कंपनीतून वायुगळती होऊन नागरिकांच्या, मुलांच्या जीविताशी खेळणाऱ्या संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्याचा एकमुखी ठराव जयगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आज झालेल्या बैठकीत घेतला. त्यानुसार जयगड ग्रामस्थांनी जयगड सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना भेटून निवेदन सादर केले. काल (१२ डिसेंबर) जिंदाल पोर्ट प्रकल्पामधून वायू गळती होऊन जयगड विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना जीवघेणी वायु बाधा झाली होती.
या गंभीर प्रसंगाने नागरिकांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाला असून, कंपनी व्यवस्थापन किंवा जबाबदार व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. याबाबत स्थानिक जनतेच्या भावना तीव्र आहेत.
पुढील योग्य ते उपाय योजनेबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे जयगड ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी प्रमोद प्रभाकर घाटगे, जयवंत गजानन आडाव, संदीप बाजीराव शिरधनकर, अनिरुद्ध कमलाकर साळवी, अस्लम हसन बक्षी, मंदार श्रीकांत बारगोडे, विकास कमलाकर निंबाळकर, फारुख हुसेन संसारे, अर्जुन शा. मेणे, सतीश ल. गडदे, सुयोग ज. बीवलकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.